Saturday, September 20, 2025

शेती प्रश्नांची गांभीर्यात संपली का ?

 शेती प्रश्नांची गांभीर्यात संपली का ?

राज्यातील शेतकरी प्रश्नांनाकडे लक्ष देण्यास कोणा वेळ दिसत नाही. आपल्या राज्यातील एक मागास प्रदेश म्हणून ओळखला जाणारा प्रादेशिक विभाग म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भ. आज मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी राज्यातील इतर भागातल्या शेतकऱ्यांइतका प्रगत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने शेत जमीन धारणा कमी झाली आहे. शेतीत काम करण्यास मजूर मिळत नाही. मुबलक सिंचन व्यवस्था नाही. सतत एक पिक पद्धतीने बाजार भाव नियंत्रण करून सरकार पिकांना भाव देत नाही. शेतात ऊस लागवड केली तर कारखाने भाव देत नाही. आज राज्यातील व देशातील बहुतांश शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत हे केवळ शेती क्षेत्र बंदिस्त करून ठेवल्यामुळे झाले आहे. शेती व्यवसाय वर उदरनिर्वाह करणारा खूप संकटात आहे. दिवसेंदिवस आत्महत्या सत्र वाढत आहे. सरकार देखील त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पूर्व शेतकरी आत्महत्या झाली म्हणून हेडलाईन येत असे आता आरक्षण मिळत नाही म्हणून हेडलाईन येते. आमच्या साठी मनुष्य मरणाची किंमत नाही पण आरक्षण तेवढ महत्वाचे आहे. आमच्या मूळ समस्या ही आर्थिक मागासलेपणात आहे. हे केवळ शेती ही फायदेशीर नसल्याने झाले. ज्या कुटुंबात सरकारी नोकरीला आहे. त्यांना आरक्षण असले काय आणि नसले काय फायदा काही नाही. शेतीतील मूळ प्रश्न समजून घेऊन काम केल तर परिस्थितीत सुधारणा होईल.

तंत्रज्ञान स्वातंत्र्य अभाव

राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना नावीन्यपूर्ण शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधनांची गरज भासणार ही गोष्ट स्वाभाविक वाटत असली तरी त्यांची पोच मात्र या तंत्रज्ञानाच्या वापराची नाही हे वास्तव सुद्धा विसरून चालणार नाही. यावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात हे खरे आहे. मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळतो हा विचार करण्यासारखा घटक आहे. आज शेतीतील तंत्रज्ञान सुद्धा उंच भरारी घेत आहे. आधुनिक ड्रोन तसेच विविध स्वयंचलित यंत्रसामुग्री पासून ते दिवसागणिक प्रगत होत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI टेक्नॉलॉजीचा वापर निश्चितच शेतकऱ्यांना शेती सुलभ आणि फायद्याची करण्यास उपयुक्त ठरत आहे याबद्दल शंका नाही. मात्र किती शेतकरी या नवीन यंत्रणांना आपलेसे करून शेतीत भरघोस उत्पादन घेण्यास आर्थिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम आहेत याचे अवलोकन करणे सुद्धा आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे बी - बियाणे लागवडी बाबत का नाही विचार करत. बी टी बियाणे आले. विदर्भ कापसाची पंढरी ओळखली जाऊ लागली. आज विदर्भात कापूस लागवड क्षेत्र कमी होऊन सोयाबीन लागवड वाढ झाली. कापूस लागवड करून भाव नाही. त्याऐवजी शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आणि पिक हातात आले की भाव पडला. एच टी बी टी बियाणे तंत्रज्ञान स्वतंत्र्य सरकार का? देत नाही. तंत्रज्ञान वापर करण्यासाठी आग्रह करणारे सरकार बी – बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्य  देत नाही. तंत्रज्ञान वापर करा आणि उद्योग क्षेत्र तेजीत ठेवा. 

शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर

आजही राज्यातील अनेक शेतकरी पाहायला मिळतात ज्यांच्यावर कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आणि इतिहासात डोकावून पाहिले तर दिसून येणारा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पहिला तर विदर्भा नंतर मराठवाडा आघाडी घेत आहे. दिवसाला ६ ते ७ शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने यांची आपल्याला जवळून ओळख झाल्याशिवाय राहत नाही. सरासरी प्रत्येक तिसऱ्या शेतकऱ्यावर एकतर पारंपरिक सावकाराचे कर्ज आहे नाहीतर त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढलेला आहे. त्यात हवामानाच्या लहरीपणामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडून या भागातील शेतकऱ्यांची शेती नेहमी तोट्यात असते. अशा परिस्थितीतही जोमाने उभे राहून स्वतःच्या कुटुंबाचे पालपोषण करण्याची धमक या आहे. मात्र कर्जामुळे खंबीर शेतकरी सुद्धा मानसिक दृष्ट्या खचून जातो हे सुद्धा नाकारून चालणार नाही. त्यात शेती माल खरेदी व विक्रीचे स्वातंत्र्य नाही. सरकार भाव ठरवणार आणि तोटा जरी होत असला तरी मार्केट मध्ये गेलेला माल पुन्हा घरी परत येत नाही. जो भाव मिळेल त्या भावला विक्री करावी लागते. शेतकऱ्यांचा फायद्यासाठी योजना तयार केल्या प्रत्यक्ष शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकरी किती लाभार्थी आहे? पांढरे हत्ती सुदृढ होत आहे आणि शेती कसून उदरनिर्वाह करणारा कर्जाच्या डोंगराने गळा फास घेत आहे. प्रशासन यंत्रणा अकार्यक्षम असल्याने ही परिस्थिती आहे. कर्ज असल्याने मुलांचे शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. आज शेतकरी आत्महत्या मुळे दरवर्षी अनेक मुल ही अनाथ होत आहे. वडिलांचे आधाराचे छत अचानक गेल्याने लहान लेकराना कुटुंबात सांभाळ करणारी स्त्री बाबत समाज तेवढा संवेदनशील नाही.

शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने इतक्यावरच थांबत नाहीत. समजा एखाद्या वर्षी सर्व गोष्टी शेतीसाठी अनुकूल राहून शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळालेच तर त्यावर्षी बाजारभाव मिळेल अन् खर्च तरी निघेल याची सुद्धा शाश्वती नाही. याच वर्षी बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकावर झालेला खर्च सुद्धा निघाला नाही अशी बिकट अवस्था आहे. आपण वर्तमान पत्रात नेहमी बातम्या वाचतो की अमुक अमुक शेतकऱ्याने त्याच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने रागाच्या भरात सर्व माल रस्तावर फेकून दिला. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळली गेलेली ही शेती अन् त्यातून निघालेले उत्पादन शेतकऱ्यांना योग्य बाजारभावाच्या अभावी फेकून देण्याची पाळी येऊन रिकाम्या हाताने आपल्या परिवारात परतणे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. आवश्यक वस्तू कायद्याचं वापर करून सरकार शेतमालावर भाव नियंत्रण करते. उद्योगाचा हिताच्या दृष्टीने नेहमी विचार केला जातो. शेतकरी का हालआपेष्ट करत जीवन जगला पाहिजे असे कायदे आणि धोरण राज्यकर्ती राबवित असतात. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने खूप आहेत. त्यासाठी ए.सी. मध्ये बसून धोरण आणि नियोजन करणारे नको तर प्रत्यक्षात शेतीवर उदरनिर्वाह करणारे असणे गरजेचे आहे. शेतकरी बांधव हा दरवर्षी एकतर हवामानाच्या अस्थरतेमुळे किंवा दलालांच्या शोषणामुळे पिळला जातो ही वस्तुस्थिती आहे.

पावसाची अनियमितता आणि हवामान बदल

राज्यातील  शेतकऱ्यांच्या समस्या आणि आव्हाने याबाबत विचार करत असतांनाआपल्याला नैसर्गिक आव्हानांचा सुद्धा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. ग्लोबल वॉर्मिगच्या वाढत्या प्रभावामुळे याचा देशातील ऋतूचक्रावर अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. याचेच फलित असे की मागील काही दशकांपासून पावसाळ्यात उचित पर्जन्यमान अनुकूल परिस्थिती आढळून येत नाही. दर वर्षी एक तर ओला किंवा कोरडा दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या नशिबीच लिहिला गेलेला आहे की काय अशी अनुभूती येते. एकूणच काय तर हवामानाची चंचलता यावर मात करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवर पर्यावरणाचा समतोल राखणे अनिवार्य आहे. निश्चितच हे काही १ ते २ दिवसांत होणारे काम नाही. यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होऊन उपाययोजना तसेच बचावात्मक नियोजन व जबाबदारी सरकारकडून उचलण्यात येणे आवश्यक आहे. यासाठी महत्वाचे म्हणजे हवेतील ओला ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. हवेतील ओला ठेवला तर जमीनीत देखील ओलावा असतो. आज मोठ्या प्रमाणात हवेतील ओलावा गेल्यामुळे धुळीचे प्रमाण देखील वाढले आहे. हवामान बदल सुधारणा करण्यासाठी शेतकरी बांधवानी स्वताहून पुढे येऊन विज्ञान समजून घेतले तर तंत्र विकसीत होऊ शकेल.

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

लेखक – शेती प्रश्नांचे अभ्यासक आहे.

चलभाषा – ९०९६२१०६६९ 

शेतमालाला भाव नाही, शेतकरी हवादिल !

 शेतमालाला भाव नाही, शेतकरी हवादिल !

 

यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचा आढळून आले आहे. आरबीआय ने ही माहिती दिली आहे त्यानुसार अन्नधान्य आणि डाळी यांच्या किमती मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत. आरबीआयच्या बुलेटीन नुसार शेतमालाचे भाव पाडले असताना सोयाबीन सूर्यफूल मोहरी आणि अन्य तेलाच्या किमती मात्र वाढत आहेत पाम आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत थोडी नरमाई दिसत आहे. कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे बटाटे आणि टमाट्याच्या किमती वाढल्या आहेत केंद्र सरकार २३ पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करत असते.

 

हमीभाव म्हणजे काय? - शेतकऱ्याला त्याच्या शेतमालावर ठरावीक किंमत मिळणारच याची हमी देण्यासाठी सरकारने ठरवलेली ‘किमान आधारभूत किंमत’ (मिनिमम सपोर्ट प्राइस) म्हणजे हमीभाव. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण  मंत्रालयात ‘कमिशन फॉर अग्रिकल्चरल कॉस्ट अॅण्ड प्राइजेस ’ ही स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी आहे. या समितीला महाराष्ट्रातील ‘कृषी मूल्य आयोगा’सह, राज्याराज्यांतील समित्या वा आयोग याकामी मदत करतात.

 

किती पिकांसाठी?  - रब्बी व खरीप हंगामात अनेक प्रकारची पिके घेतली जातात. पैकी फक्त २३ वाणाचेच हमीभाव केंद्र सरकार जाहीर करते. त्यात प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, साळ, करडई, मूग, उडीद ,सोयाबीन, तूर, शेंगदाणा, हरभरा, तीळ, कापूस, सूर्यफूल अशा प्रमुख पिकांचा समावेश आहे.

 

एम एस पी आणि बाजारभावातील फरक (खालील फरक टक्क्यां मध्ये आहे)

 

पीक

सन २०२४

सन २०२५

मका

०.८

८.१

भात

६.०

२.४

गहू

१.९

१.२

तूर

५२.९

७.१

मूग

१.५

६.७

मसूर

८.०

४.९

उडीद

२९.६

२.१

चणा

६.६

०.६

शेगदाणे

३.५

२४.३

सोयाबीन

२.६

१४.०

मोहरी

८.२

२.१

 

हमीभावाचे निकष काय? - उत्पादन खर्च व खर्चाच्या ५० टक्के नफा हा हमीभाव जाहीर करण्यात येतो खर्च हे निश्चित केलेले आहेत त्यासाठी वेगवेगळे निकष आहेत. केंद्रीय कृषी मूल्य आयोग यांनी हमीभाव ठरवण्यासाठी तीन निकष ठरवलेले आहेत.

(१) बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन यासाठीचा लागणारा खर्च.

(२) शेतकरी व त्याच्या घरातील व्यक्ती यांचे श्रम त्या त्या पिकासाठी किती करावे लागले त्याची मोजदाद केली जाते.

 

पण सरकारी खरेदीही होतेती किती? - हमीभावाने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार ‘नाफेड’ मार्फत हमीभावाने खरेदी करते. अर्थात शेतकऱ्याच्या सर्वच मालाची खरेदी करणे केवळ अशक्य; कारण तेवढी यंत्रणाच उभी करणे अवघड आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारला वाटेल तेवढाच माल खरेदी करते बाकी माल शेतकऱ्यांचा विक्री झाला की नाही याबाबत उदासीनता असते. सरकार हमीभाव जाहीर करते पण बाजारपेठेत भाव शेतकऱ्याला मिळत नाहीत. सरकारी खरेदी केंद्र कमी असल्याने आणि सरकारचे अपुरी यंत्रणा यामुळे बाजारात व्यापारी फायदा घेऊन हमीभावा पेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करतो.

 

सोयाबीन हवादिल - गेल्या दोन वर्षांपूर्वी दहा हजार चा पल्ला काढलेला सोयाबीनचा यावर्षी प्रतिक्विंटल हमीभाव ४८९२ आहे. मात्र सोयाबीन हमीभाव केंद्रावर फार कमी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आलेला अनेक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापरांना कमी भावात सोयाबीनची विक्री केली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची घोर निराशा झाली यंदाच्या सोयाबीनची प्रतिक्विंटल हमीभाव ४८९२ हे मात्र हमीभाव केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचे नंबर लागत नसल्याने अनेक सोयाबीन उत्पादकांनी खाजगी व्यापाऱ्याकडे सोयाबीन विक्री केला आहे. खाजगी व्यापारी प्रतिक्विंटल ४१५० च्या वर सोयाबीन घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे अनेकांनीच सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहेत. एकीकडे रासायनिक खते, बी बियाणे, औषधे याचा भाव वाढलेले असताना दुसरीकडे मात्र शेतमालाच्या किमती उतरत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणी सापडला आहे. आज बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीचे सोयाबीनची गंजी लावले आहेत.

                                 

रड महाराष्ट्रापुरतीच आहे? - पंजाब, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील सरकारे शेतमाल खरेदीसाठी प्रचंड यंत्रणा उभी करतात; तेवढी यंत्रणा मात्र महाराष्ट्र सरकार सक्षमपणे उभी करु शकले नाही. त्यामुळे हमीभाव जाहीर केला म्हणजे शेतीमाल हा हमीभावाने खरेदी केला जातो असे नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा, यासाठी कृषी पणन विभागाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केली होती. मात्र केंद्रांवर केवळ दर्जेदारच मूग, उडीद सोयाबीन खरेदी केली गेली. महाराष्ट्रातील हतबल शेतकऱ्यांना पुन्हा आडते व्यापाऱ्यांच्या दारी जाऊनच मूग, उडीद सोयाबीनची विक्री करावी लागली. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने नाफेडच्या माध्यमातून मूग, उडीद सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. मार्केटिंग  फेडरेशनकडून ही खरेदी केंद्र सुरू करण्यात आली पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे दिसले. हमीभाव जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री केला गेला नाही. सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून सतत कुठल्यातरी खोट्या अशाने शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकरी नेते कै. शरद जोशी साहेब म्हण्याचे सरकार हीच मोठी समस्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेत माल खरेदी व विक्री बाबत आत्मनिर्भर झाले पाहिजे. माझा शेतमाल आणि माझी किंमत हे धोरण अवलंबून शेतमाल विक्री केला पाहिजे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९