हवा प्रदूषण : महाराष्ट्रातील न दिसणारा पण घातक “सायलेंट किलर”
महाराष्ट्रात हवा प्रदूषण ही समस्या आता केवळ
महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. वाढते शहरीकरण, उद्योग, वाहनांची
संख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे राज्यातील हवा दिवसेंदिवस अधिक विषारी होत चालली
आहे. धूर, धूळ आणि अतिसूक्ष्म कण डोळ्यांना दिसत नसले,
तरी ते माणसाच्या शरीरात शिरून आतून हळूहळू नुकसान करत आहेत.
त्यामुळेच तज्ज्ञ हवा प्रदूषणाला “सायलेंट किलर” असे संबोधतात. हवा प्रदूषण ही
फक्त शहरांची समस्या आहे, असा गैरसमज आजही ग्रामीण
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आढळतो. प्रत्यक्षात मात्र हा गैरसमजच जीवघेणा ठरत
आहे. शहरांमधील वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि
उद्योगांमधून निघणारे प्रदूषक जसे आरोग्यावर परिणाम करत आहेत, तसाच ग्रामीण भागातील घरगुती धूर, कचरा जाळणे आणि
रस्त्यांवरील धूळही माणसांचे आयुष्य कमी करत आहे. कोणताही आवाज न करता, कोणताही इशारा न देता शरीरात शिरणारा हा धोका म्हणजे हवा प्रदूषण एक खरा
सायलेंट किलर. जनतेला शहरी भागातील वायु प्रदूषणाविषयी माहिती असल्याचे मानले तरी,
ग्रामीण भागातही वायु प्रदूषणाचे प्रमाण जवळपास शहरांइतकेच गंभीर
स्थितीत आहे. केवळ वाहतूक, उद्योग किंवा निर्माण धूळ नसून
घरगुती धूर, बायोमास इंधनाचा वापर आणि शेती अवशेष जाळणे हे
ग्रामीण हवेमध्ये प्रदूषण वाढवणारे प्रमुख कारणे आहेत. पुरेशा निरीक्षण यंत्रणा
नसतानाही उपलब्ध अभ्यास हे स्पष्ट करतात की ग्रामीण वायु प्रदूषणाचा परिणाम किती
गंभीर आहे.
PM2.5 पातळी – ग्रामीण आणि शहरी जवळपास समान
अलीकडील क्लाइमेट ट्रेंड्स आणि सीएसई (Centre for Science and Environment) च्या अभ्यासानुसार,
2022 मध्ये ग्रामीण भारतात वार्षिक PM2.5 चे
सरासरी प्रमाण ~46.4 मॅक्रोग्राम/घनमीटर होते, तर शहरी भारतात हे ~46.8 मॅक्रोग्राम/घनमीटर होते. राष्ट्रीय
मर्यादेच्या (40 μg/m³) दोन्हीपेक्षा जास्त. याचा अर्थ
असा की ग्रामीण हवा शहरांच्या तुलनेत तुलनेने कमी प्रदूषित नसून समानपणे विषारी
आहे
राज्यातील मुंबई, पुणे,
नागपूर, पिंपरी-चिंचवड यांसारख्या प्रमुख
शहरांमध्ये PM2.5 या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण सातत्याने
सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. काही कालावधीत नागपूरमध्ये PM2.5
पातळी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा तब्बल नऊ पट
अधिक आढळली आहे. मुंबईत काही काळ हवा गुणवत्तेत थोडी सुधारणा दिसत असली, तरी ती अजूनही आरोग्यास सुरक्षित म्हणता येईल अशी नाही. या प्रदूषित
हवेमुळे दरवर्षी हजारो नागरिकांना हृदयविकार, श्वसनाचे आजार
आणि फुफ्फुसांच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
|
वर्ष 2019 ते 2025 : महाराष्ट्रातील PM2.5 |
|
||||
|
वर्ष |
महाराष्ट्र – सरासरी PM2.5 (µg/m³) |
ग्रामीण भाग – अंदाजे PM2.5 (µg/m³) |
ट्रेंड / विश्लेषण टिप्पणी |
||
|
2019 |
~43.1 (शहरी) /
~39.7 (ग्रामीण) |
~40–42 |
2017–22 ट्रेंडनुसार
ग्रामीण PM2.5 मध्यम पण चिंताजनक स्तरावर; राष्ट्रीय मानकाच्या अगदी जवळ. |
||
|
2020 |
(मर्यादित
डेटा) |
~45–47 |
कोविड लॉकडाऊनमुळे काही काळ
तात्पुरती घट; वर्षाच्या उत्तरार्धात पुन्हा वाढीची सुरुवात. |
||
|
2021 |
(मर्यादित
डेटा) |
~46–48 |
हवामानातील स्थिरता, कमी वायुवीजन
व स्थानिक धूर यामुळे PM2.5 पातळी वाढलेली. |
||
|
2022 |
~44.9 (शहरी) /
~46.8 (ग्रामीण) |
~46–47 |
ग्रामीण PM2.5 राष्ट्रीय
मर्यादेपेक्षा जास्त; राज्यभर प्रदूषण कायम असल्याचे
स्पष्ट. |
||
|
2023 |
अंदाजे ~47–49 |
~47–49 |
ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत
प्रदूषण वाढले; NCAP उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशाचे संकेत. |
||
|
2024 |
अंदाजे ~48–50 |
~48–50 |
हिवाळी हंगाम, पीक अवशेष
जाळणे व घरगुती धूर यामुळे सूक्ष्म कणांमध्ये वाढ. |
||
|
2025 |
अंदाजे ~49–52 |
~49–52 |
ग्रामीण भागातील PM2.5 पातळी
शहरी भागाइतकीच किंवा अधिक; ग्रामीण वायु प्रदूषणाची
गंभीरता ठळक. |
||
स्त्रोत - Maharashtra NCAP
Cities Air Quality Analysis Report (2019–2025)
हवा प्रदूषणाचा सर्वात धोकादायक पैलू म्हणजे त्याचा
परिणाम लगेच जाणवत नाही. श्वास घेताना वेदना होत नाहीत, पण वर्षानुवर्षे प्रदूषित हवा शरीरात
जात राहिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, उच्च रक्तदाब,
दमा, अस्थमा, ब्राँकायटिससारखे
आजार बळावतात आणि आयुर्मानही कमी होते. डॉक्टरांच्या मते, महाराष्ट्रातील
अनेक शहरी भागांत वाढत्या रुग्णसंख्येमागे हवा प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण ठरत
आहे. आज शहरी किंवा ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात सिमेंटचे बांधकाम होत आहे.
यापूर्वी मातीचे घर, डांबरी रस्ते होते. सिमेंटचे रस्ते आणि बांधकाम यामुळे बारीक
धुळीचेकण डोळ्याने न दिसणारे कण हे शरीरात जातात. ग्रामीण महाराष्ट्रात मात्र हवा
प्रदूषणाचा वेगळाच आणि अधिक दुर्लक्षित चेहरा दिसतो. येथे मोठे उद्योग किंवा
वाहनांची गर्दी कमी असली तरी घरातील धूर हा मोठा आरोग्यधोका बनला आहे. आजही अनेक
ग्रामीण घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, शेणाच्या गोवऱ्या,
काडीकचरा किंवा जैवइंधनांचा वापर केला जातो. बंद किंवा कमी
वेंटिलेशन असलेल्या घरांमध्ये हा धूर बाहेर न जाता घरातच साचतो. या धुराचा
सर्वाधिक फटका महिलांना आणि लहान मुलांना बसतो. सततच्या धुरामुळे अनेक महिलांना
कायमचा खोकला, छातीत जडपणा, डोळ्यांची
जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी, न्यूमोनिया आणि दम्यासारखे आजार वाढताना दिसतात. हे आजार अचानक होत नाहीत,
तर वर्षानुवर्षे घेतलेल्या प्रदूषित श्वासाचा हा परिणाम असतो.
दुर्दैवाने या आजारांचे मूळ कारण अनेक वेळा ओळखले जात नाही.
ग्रामीण भागात कचरा जाळणे, शेतातील पीक अवशेष पेटवणे आणि
रस्त्यांवरील धूळ यामुळे स्थानिक पातळीवर हवा अधिक विषारी होत चालली आहे. याचा थेट
परिणाम वृद्ध, गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर
होतो. आजारी पडल्यानंतर औषधोपचार केले जातात, मात्र आजार का
होतो, याचा विचार फारसा केला जात नाही. हवा खराब आहे,
हे स्वीकारायलाच आपण तयार नाही, हीच सर्वात
मोठी समस्या आहे. हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम केवळ आरोग्यापुरते मर्यादित राहत
नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये कमावती व्यक्ती आजारी पडल्याने आर्थिक संकट निर्माण
होते. उपचारांचा खर्च, कामाचे दिवस कमी होणे आणि वाढते आजार
याचा परिणाम संपूर्ण समाजावर होत आहे. त्यामुळे हवा प्रदूषण हा केवळ पर्यावरणाचा
प्रश्न नसून तो थेट सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक स्थैर्याशी जोडलेला प्रश्न आहे. या
परिस्थितीत केवळ सरकार किंवा यंत्रणांकडे बोट दाखवून चालणार नाही. समाज म्हणून
प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. गावात कचरा जाळणे थांबवणे,
स्वयंपाकासाठी शक्य तिथे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे, जेवढे कमीत कमी सिमेंट रस्ते बांधकाम होणे आवश्यक आहे. घरात योग्य
वायुवीजन ठेवणे आणि शेतातील अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा खत किंवा अन्य उपयोग करणे
हे छोटे पण प्रभावी उपाय आहेत. ग्रामसभा, बचतगट, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी हवा प्रदूषणाबाबत व्यापक जनजागृती
केली पाहिजे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन “कचरा जाळू नये” हा सामाजिक नियम बनवणे
अत्यंत गरजेचे आहे. जसा पाणी, स्वच्छता आणि आरोग्याबाबत
विचार केला जातो, तसाच विचार शुद्ध हवेबाबत करणे ही आजची गरज
आहे. हवा आपली आहे, ती कुणाच्या मालकीची नाही. पण ती खराब
झाली तर त्याची किंमत आपल्यालाच आपल्या आरोग्याने मोजावी लागते. महाराष्ट्राने,
विशेषतः ग्रामीण भागाने, वेळीच जागं होऊन हवा
प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं, तर हा सायलेंट किलर पुढच्या
पिढीचं आयुष्य कमी करण्यात मागे-पुढे पाहणार नाही. शुद्ध हवा ही केवळ हक्काची
मागणी नाही, तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९
लेखक – सामाजिक कार्य क्षेत्रात कार्य करत आहे.