Saturday, January 15, 2022

शिक्षणाने घोडं कोणाचं मारलं....

 



शाळा बंद हा शब्द आता सहन होत नाही. आरोग्य जेवढे महत्वाचे तेवढे शिक्षण देखील महत्वाचे आहे यांचा विसर पडला दिसतो. कोरोना आणि त्यामुळे आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करोनो तिसरी लाट सुरु झाली आणि जास्त उद्रेक नसतांना देखील सरसकट शाळा बंद हा निर्णय शासनाने घेऊन मुलांचे आयुष्य बरबाद करण्याचे ठरवले दिसते. आज ऑनलाइन शिक्षण या मुद्द्यावर भर आहे. पण त्यापाठोपाठ असेही प्रश्न उपस्थित होत आहेत की, या चर्चेची एवढी घाई कशाला? गेली २ वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरु आहे त्यांचा नेमका परिमाण विद्यार्थीवर काय होतो यांचा विचार करायला पाहिजे. ऑनलाइन शिक्षणसाठी लागणा-या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? लहान मुलांना मोकळे का सोडले जात नाही? इत्यादी इत्यादी.

कोव्हिड१९ ने सर्वच क्षेत्रांपुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले आहेत. त्यास शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्रे सुरळीत सुरू झाले होते आणि तिसरी लाट सुरु झाली म्हणून सरसकट शाळा बंद निर्णय झाला. हे कशासाठी तर मुलांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी भर दिला जात आहे. मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे ही महाकठीण गोष्ट. निदान शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणांमुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देतात. घरात मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्याने घरून शिक्षण’ (लर्न फ्रॉम होम) या संकल्पनेचं किती यश आलं यांचा काही अभ्यास झाला नाही. लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून जेवढे तुम्ही रोखाल तेवढे ते आणखी हट्टाने तीच कृती करतात. मोबाइलचेच उदाहरण घ्या ना. मोबाइल घेऊ नको, असं कितीही बजावून सांगितले तरी ते या ना त्या कारणाने मोबाइल डोळ्यासमोर धरतातच. याला सध्याच्या परिभाषेत स्क्रीन टाइमअसे म्हटले जाते. स्मार्टफोन आणि स्क्रीन यांच्यापासून लहान मुलांना फार काळ दूर ठेवणे शक्य होत नाही. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या लहानग्यांना या स्क्रीन टाइमपासून कसं भरकटवायचे हा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.उलटपक्षी असाही विचार करणारे आहेत की, आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडा बदल करण्यात थोडे जरी यशस्वी ठरलो आणि लहान मुलांच्या कलेनुसार घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा स्क्रीन टाइम कमी करता येईल. त्यांचे गॅजेट्सवरील अवलंबित्व कमी केले तर पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर त्यांचे नाते आणखी दृढ होण्यास मदत होईल. मात्र, अल्प उत्पन्न गटातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अगदी असंच्या असे घडेल, याची काही शाश्वती नाही.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे शिकवण्याचं एकमेव साधन नव्हे. हा एक पर्याय आहे. काही तंत्रस्नेही शिक्षक महाराष्ट्राचं, देशाचं बोलतात. किती लाख लोकांनी व्हिडिओ बघितला, किती लाख लाइक्स आले, किती लाख. अशा त्यांच्या सगळ्या लाखांच्या गोष्टी असतात. असे तंत्रस्नेही हे विद्यार्थिस्नेही आहेत काय? त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी त्यांनी गोष्टी करायला हव्यात. दिव्याखाली अंधार नाही ना. हे तपासावं लागेल.घरी रेंज नाही, जंगलात रेंज येते म्हणून अशा ठिकाणी झोपडी बांधून काही मुलांनी शिकणं सुरू केलं. दुसरा पर्याय नसल्यानं मुलं बेजार तर झाली नाहीत ना. महाराष्ट्रातल्या दोन मुलांनी अँड्रॉईड मोबाईल मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. इतर राज्यांतही अशा घटना घडत आहेत. आत्महत्या करायला भाग पाडणारी ही कसली आली शिक्षणाची पद्धत? शिक्षणानं जगायला शिकलं पाहिजे, मरायला नाही. जगायला शिकवतं ते शिक्षण.

मूल शिकावं म्हणून पालकांनी जिवाचं रान करणं ठीक पण अँड्रॉईड मोबाईलसाठी जिवाचं रान करावं, घरातलं गरजेचं किडूकमिडूक विकावं हा ऑनलाईनच्या लाटेचा परिणाम नाही ना बऱ्याच वेळा आमचं शिक्षण लाटेवर स्वार होतं. कधी पहिलीपासून इंग्रजी तर कधी रचनावाद. लाट ओसरली की मग पुढची लाट यायची वाट किती दिवस बघत बसायचं. असं म्हणत लाट आली कि प्रथम परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर होतो. शिक्षण बंद असल्याने मुलांना निरक्षर बनवले जात आहे. मुलांना वाचन, लिखाण गणिता मधील सज्ञा देखील व्यवस्थितपणे सोडवता येत नाही. आज शिक्षण बंद ठेवणे म्हणजे एका पिढीचे संपूर्ण नुकसान होणार आहे. महाविद्यालय मध्ये प्रत्याक्षिक शिक्षण बंद असल्याने भविष्यातील इंजिनिअर, वकील, शिक्षक व डॉक्टर कसे घडतील ? इतर सर्व गोष्टी मध्ये सवलत आणि मर्याद शासन देते शिक्षणात मात्र बंद हे योग्य नाही. जून महिना आली कि शाळा सुरु होते. शाळेत फी मात्र वेळेवर घेतली जाते आणि जानेवारी महिन्यात कोरोना आपला अवतार बदलतो व शिक्षण बंद होते.

        आज ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान कितपत पोहचले आहे. शिक्षण बंद करून मुलांना घरात बंदिस्त ठेवले तर मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होते. मुलांच्या बौद्धिक वाढ हि लहान वयात होते आणि शाळा बंद जर असेल तर मुल घरात हिंसक होतील हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आज दोन वेळेच्या जेवणासाठी महागाईच्या काळात आई व वडील दोन्ही कामावर जातात. अश्यावेळी मुलांकडे घरी लक्ष देणार कोण अशी परिस्थिती हि फक्त ग्रामीण भागात आहे असे नाही तर शहरात देखील वेगळ नाही.  कोविड-19 च्या साथीने आज संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था आणि सामाजिक स्तरावर मोठा परिणाम केला आहे. कोविड-19 च्या प्रभावामुळे सरकारकडून वेळोवेळी लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. या सूचनेमुळे शाळा, महाविद्यालय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू झाली असली तरी ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रणाली फारशी प्रभावी ठरणार नाही. कारण तेथील बहुतांश लोकांकडे ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी अँड्रॉइड फोन नाही आणि नेटची योग्य व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. कोविड-19 च्या प्रभावामुळे विविध प्रकारच्या परीक्षाही रद्द करण्यात येतील अशी शक्यता वाटते  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला. परीक्षा नसल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. नवीन सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुढे कठीण काम करावे लागणार आहे.

भविष्यात शिक्षण व्यवस्था पुन्हा योग्य पातळीवर आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलावी लागतील. कोविड-19 मुळे उद्भवलेली ही परिस्थिती विद्यार्थ्यांचे मनोबल आणि अभ्यासाप्रती असलेल्या समर्पणाला धक्का देत आहे. शाळा उघडल्या पाहिजे. जिथे रुग्ण नाही तिथे किमान शाळा दोन पाळी मध्ये भरवता येईल. मुलांची संख्या मर्यादित करून आलटून पालटून मुलांना शाळेत बोलवता येणे शक्य आहे. असे काही पर्यायाचा विचार न करता शाळा सरसकट बंद करून टाकणे म्हणजे विद्यार्थच्या आयुष्या सोबत खेळणे होईल. पालकांना विश्वासात घेऊन शाळा सुरु ठेवले पाहिजे. आज अखेर असे म्हणावे लागते कि शिक्षणाने घोडं कोणाचं मारलं आहे. त्यामुळे जसी काळजी आरोग्याची आहे तशी शिक्षणाबाबत काळजी घेणे समाज म्हणून आपली जबाबदारी आणि शासन म्हणून कर्तव्य आहे.

 

मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

चलभाषा – ९०९६२१०६६९ 


6 comments:

  1. अतिशय वास्तविक लेखन केले आहे मयूर सर . शिक्षण हा राष्ट्राचा कणा असतो. कोविड मुळे शैक्षणिक व्यवस्था कोलमडली आहे. किती दिवस अशाच शाळा बंद राहणार ?

    ReplyDelete
  2. खुप छान,नेमका विषय व वास्तवता....

    ReplyDelete
  3. वास्तववादी चित्र
    1. शिक्षकांचा वाटा ही मोलाच आहे ,आपले पगार चालू जसे संस्था चालकांचे ही बरे चालू आहे ,ऑनलाईन शिक्षण घेणे जसे विद्यार्थ्यांचे ध्येय आहे तसेच् वास्तविकतेत शिक्षकान्नि मुलाच्या शैक्षणिक परिनामाचे अवलोकन करावे ही अपेक्षा पालकांची रास्त आहे

    ReplyDelete
  4. वास्तव कळत नाही. संभ्रमाची अवस्था आहे.

    ReplyDelete
  5. मयूर सर, दाहक बोलकं वास्तव, पण पुढं काय?

    ReplyDelete