शेतकऱ्यांचे नवीन वर्ष कधी साजर होणार...!
भारत हा कृषिप्रधान देश आहे, असं अभिमानानं म्हणण्याचे दिवस संपले. देशातील इतर लोकांना
आणि पुढाऱ्यांना आता शेतकऱ्यांची गरज उरली नाही. कृषिप्रधान आणि विविधतापूर्ण
असलेला हा देश मुळापासून विस्कटून टाकला जात आहे. ‘‘शेतकऱ्याच्या कणसाला, दाण्यागोठ्यालाही हात लावता
कामा नये’’ अशी आपल्या सरदारांना, सैन्याला सक्त ताकीद देणारे
सकलजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज
राज्यकर्ते म्हणून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी सदैव उभे राहिले. शिवकाळात
ज्वारीच्या कणसाच्या रक्षणासाठी तलवार होती. ही तलवार कणीस पिकवणाऱ्यांवर कधी
उगारली गेली नाही. उगारली गेली तेव्हा उगारणाऱ्याचे हात कलम केले गेले.
एकोणिसाव्या शतकात ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहून महात्मा जोतीराव फुले यांनी
शेतकऱ्यांची कैफियत तळमळीने मांडली. शेतकऱ्यांना छळणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्यांच्या विरोधात जोतीरावांची लेखणी
तळपते. महात्मा गांधी यांनी ‘‘खेडे नष्ट झाले तर हिंदुस्थानही नष्ट होईल. मग तो
हिंदुस्थान राहणार नाही. त्याचे जीवितकार्य हरपल्यासारखे होईल,’’ अशी ठाम भूमिका शेती-शेतकरी आणि खेड्यांच्या संदर्भात कायम
घेतली. याचाच अर्थ शेतकरी जगला, तर देश जगेल, शेतकरी संपला तर हा देशही संपेल, असं तळमळीनं सांगत महात्मा गांधी सदोदित शेतकऱ्यांच्या
बरोबर राहिले. चंपारण्य, चारीचौरा, निळीचे आंदोलन,
याचे स्मरण केले तर गांधी
किती खंबीरपणे शेतकऱ्यांबरोबर राहिले ते दिसते. ‘‘गोरगरीब, कामकरी व शेतकरी वर्गाचे हितरक्षण करणे, हे आपल्या पक्षाचे पहिले कार्य आहे,’’ असे डॉ. आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेत
ठणकावून सांगितले होते. इतिहासपुरुषांच्या आणि राष्ट्रपित्याच्या या कार्याचा विसर
पडणं, हा देशासाठी मोठा दैवदुर्विलास आहे. नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरा केला जातो पण शेतकऱ्याच्या
आयुष्यातील स्वातंत्र्याची पहाट कधी उजाडेल यांची वाट बघतो आहे.
देशात सर्वाधिक आत्महत्या करणारा शेतकरी
महाराष्ट्राचा कसा आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या करणारा विदर्भाचा कसा, हा प्रश्न सरकार,
नोकरशाही, हजारो एनजीओज्,
जातीपातींच्या लढाऊ संघटना
आणि सकल मराठी समाजाला कसा पडत नाही?
वर्षानुवर्षे वाढत जाणाऱ्या
या आत्महत्यांची कुणालाच काही शरम वाटत नाही का? निवडणूक जिंकण्याकरिता आधी शेतकऱ्याला
जिंकले पाहिजे, ही
भावना आजच्या राजकारणात मावळत चालली आहे का? हा प्रश्न यासाठी पडला आहे की, निवडणुका
जवळ आल्या आहेत. विविध सवलतींचा
पाऊस पाडला जाईल.
त्यातून रेवडी कल्चर फोफावले. आपला देश कृषिप्रधान आहे असे शिकवले जाते. मात्र, आता
निम्मी लोकसंख्या शहरात राहायला आली आहे. शहरी लोकसंख्येला शेतकऱ्यांच्या
प्रश्नांची कल्पना असणे शक्य नाही. रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल
होतो तेव्हा भाव पडले म्हणजे काय होते ते शहरांना कळते. त्या पलीकडे शहरांना
शेतमालाच्या भावाशी काही घेणेदेणे नसते. शहरातली प्रसार माध्यमेही अबोल असतात.
शहरे बोलू लागली तर सत्ताधाऱ्यावर
दबाव येतो; मात्र
तसे होत नाही. शेतकरी आत्महत्यांची बातमी
महानगरांच्या वृत्तपत्रात आतल्या पानात बारीकशी येते. शहरे सरकार बसवतात, उठवतात.
शहरेच गप्प असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचाच फुटत नाही. लोकप्रतिनिधींची
उदासीनताही नडते. आपल्याकडच्या शेतीच्या समस्या वेगळ्या आहेत. बहुतेक शेतकऱ्यांकडे
दोन एकरापेक्षा कमी शेती आहे आणि ती कोरडवाहू आहे. दीड एकरात काय नफा होणार? रोज
मरे त्याला कोण रडे अशी म्हण आहे.
महाराष्ट्रातील आणि विशेषकरून
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रमुख कारणे सर्वांना माहीत आहेत.
वारंवारची सलग नापिकी, कर्जबाजारीपणा, सुका किंवा ओला दुष्काळ,
अलीकडे अचानक पडणारा पाऊस, खते-बियाणे यांच्यात होणारी फसवणूक, प्रतिष्ठा पणाला लावून व कर्जे काढून होणारे महागडे विवाह, सावकारांकडून होणारा छळ,
बाजारात अचानक कोसळणारे भाव
आणि विमा कंपन्यांकडून सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारी फसवणूक.. ही सारी
कारणे सर्वांना माहीत आहेत. या कारणाच्या मुळाशी महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी विरोधी
नरभक्षी कायदे आहे. आज महाराष्ट्र सरकार योजनांची, अनुदानांची, शेतीमाल खरेदीची आणि कर्जमाफीची आकडेवारी तोंडावर फेकायला
कमी पडणार नाही. शेतकऱ्याच्या खात्यात कसे थेट पैसे जमा होतात, वगैरे जादू केल्याच्या थाटात पुन्हा पुन्हा सांगितले जाईल.
मग आमचा शेतकरी रोजच्या रोज फास लावून का घेतो आणि विषाची बाटली का पितो, याचे उत्तर राज्य सरकार व नोकरशाहीने महाराष्ट्राला द्यायला
हवे. सरकार हे की ते हा यातला प्रश्नच नाही. काल होते, परवा होते आणि आज आहेत;
ते व हे सगळेच यात शेतकऱ्याचे
गुन्हेगार आहेत.
या देशाची माती सर्जक आहे. ती
पोसणारी, भाईचारा जपणारी आहे. आपल्या व्रात्य, भ्रमिष्ट लेकरांनी (धरतीपुत्रांनी) केलेले अत्याचार सहन
करूनही ती त्यांना ममत्वाने पुन्हा अन्नाचे चार घास भरवून जगण्याचा अवसर देते.
तिच्यात ममत्व आहे, तसं दातृत्वही. ती विषमता
नव्हे, तर समता उगवते. द्वेष नव्हे, बंधुभाव जगवते. ती खिळे उगवत नाही,
तर अन्न पिकवून देते. ती
विषपेरणी नव्हे, तर माणुसकीची पेरणी करते.
हिसकावून घेणं नव्हे, तर देणं शिकवते. ती हात
उगारायला नव्हे, तर कष्टानं हाताला घट्टे
पाडायला शिकवते. ती उलटायला नव्हे,
तर जागायला शिकवते. ती परजीवी
नव्हे, श्रमजीवी आहे. ती बांडगूळ नव्हे, तर करोडो पोटांना जगवणारी आहे. ती विद्वेषी नव्हे, तर सहिष्णू आहे. ती एकचालकानुवर्ती नव्हे, तर लोकचालकानुवर्ती आहे. ती एकवचनी नव्हे, बहुवचनी आहे. माती म्हणजे जीवन. शेती म्हणजे जीवनपद्धती, जगण्याची संस्कृती. या देशाची नस. मृत्यूनंतर उदरात सामावून
एकजीव करणारी. तिच जन्म देते, तिच जगवते, तिच पदरी घेते. हाच शेतकरी धर्म, हीच भूमाता. भारतमाता. कृषिसंस्कृती! या शेतकरी धर्माचा
आम्ही पूर्ण आदरसन्मान करतो. तिचे शेतकरीपुत्र अन्यायाला, दडपशाहीला डरत नाहीत. सहिष्णुता, अहिंसा आणि लोकशाही मार्गाने आपला लढा व्यापक करण्याची ताकद
शेतकऱ्यांमध्येच आहे. जी गांधीजींना आकळली होती. म्हणूनच कृषिसंस्कृतीशी नाळ
असलेला एक तरुण या नात्याने या शेतकरी लढ्याला,
आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना
कृतज्ञतापूर्वक सलाम करणं, त्यांच्या अतूट धैर्याला
मानवंदना देणं, त्यांच्याविषयी सद्भावना
व्यक्त करणं, त्यांच्या सोबत राहणं, हे एक भारतीय म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी समजतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी
शेतकरी स्वतंत्र्याची मशाल पेटवून ठेवणारे किसानपुत्र आंदोलन हे समजून घेण्याची
ताकद नवीन वर्षनिमिताने शेतकरी अर्थात किसानपुत्रांना लक्षात यावे ही अशा ठेवतो.
हे ज्यावेळी समजेल त्यावेळी त्यांच्या आयुष्यातील नवीन वर्ष खऱ्या अर्थाने साजरे
होईल.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
चलभाषा – ९०९६२१०६६९